दोन प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रींशी भर मॉलमध्ये लैंगिक छेडछाड; Video व्हायरल झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 15:49 IST2022-09-28T15:43:45+5:302022-09-28T15:49:18+5:30
मंगळवारी रात्री मॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोन प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रींशी भर मॉलमध्ये लैंगिक छेडछाड; Video व्हायरल झाल्याने खळबळ
दोन प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रींनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे मोठा खुलासा केला आहे. एका मॉलमध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी त्या कोझिकोडच्या एका मॉलमध्ये गेल्या होत्या. तेव्हा जमलेल्या गर्दीत त्यांच्याशी वाईट कृत्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोकांनी अशी वागणूक दिल्याने त्यांनी पोस्टमध्ये नाराजी, राग व्यक्त केला आहे. मंगळवारी रात्री या मॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर स्थानिक माध्यमांनी त्याचे प्रसारण केले. यावर मत व्यक्त करताना त्या पीडित अभिनेत्रीने म्हटले की, कोझिकोड ही एक अशी जागा आहे, जी मला खूप आवडते. मात्र, आज रात्री एका कार्यक्रमाहून परतत असताना गर्दीतील एका व्यक्तीने मला पकडले. मला हे सांगताना खूप घृणास्पद वाटतेय की आपल्या आजुबाजुचे लोक एवढे वासनांध आहेत.
प्रत्येक सिनेमाची प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी जात असतो. मात्र, असा वाईट अनुभव मला कधीच आला नाहीय. माझ्या सहकारी अभिनेत्राला देखील हाच अनुभव आला आहे. जमावाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दुसऱ्या अभिनेत्रीने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर यावर अनुभव शेअर केला आहे. मॉलमध्ये खूप गर्दी होती, सुरक्षा रक्षक या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते, असे ती म्हणाली.
एका व्यक्तीने तिच्या सहकारी अभिनेत्रीशी लैंगिक छेढछाड केली, परंतू ती त्याला प्रतिकार करू शकली नाही. नंतर माझ्यावरही तोच प्रसंग आला तेव्हा मी प्रतिकार केला. असा अनुभव कोणालाच सहन करावा लागू नये, दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे तिने म्हटले आहे.