इंदिरानगर : चेतनानगर परिसरात रात्री अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन महिलांच्या सोनसाखळी चोरून नेत्याची घटना घडली आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत अशताना पोलिसांच्या हाती दुचाकीस्वार चोरटे लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १२) रश्मी बांदेकर (५३, शालन अपार्टमेंट,चेतना नगर) रात्री आठ वाजेच्या सुमारास सेंट फ्रान्सिस हायस्कूल समोरील रस्त्यावरून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेला चोरट्याने बांदेकर यांच्या गळ्यातील सुमारे नऊ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून लालबाग चौकाकडे पळ काढला. तर दुसरी घटना मंगला बयानी (७५ साईरत्न रो-बंगलो, चेतना नगर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास फेरफटका मारून घरी जात असताना घराच्या गेट जवळ घडली.
बयानी घराजवळ आल्या असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने बयानी यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याचे गोफ सुमारे ४५ हजार रुपयांचे बळजबरी खेचून दास मारुती चौकाकडे पळ काढला.या दोन्ही घटना अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत घडल्यामुळे चेतनानगर परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दोन टीम तयार करून सोनसाखळी चोरांचा तपास सुरू केला आहे.