अहमदनगर- सावेडी उपनगरातील गजराज नगर या ठिकाणी दोन गटांमध्ये आज जोरदार शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणांमध्ये सहा जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहरामध्ये काही ठिकाणी किरकोळ प्रमाणामध्ये दगडफेक झाली आहे. नगर शहरामध्ये गजराजनगर या ठिकाणी मंगळवारी सायंकाळच्या सुमाराला झेंडा लावण्यावरून दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणांमध्ये झाले. एका गटाकडून जोरदार दगडफेक झाली. यात 6 जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. एकाच्या डोक्याला मार लागला असून, दुसऱ्याच्या अंगावर मार लागलेला आहे.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाला होता. या ठिकाणी मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, तोफखाना ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे ,सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून,नगर शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आलेले आहेत, तर कोणालाही विनाकारण फिरु दिले जात नाही. नगर शहरांमध्ये हा घडलेला तिसरा प्रकार असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.