मुंबई - वरळी येथे धक्कादायक घटना घडली आहे. भरपावसात पावसापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या छताखाली गेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी बेदम अमानुष मारहाण केली. याबाबत बॉम्बे अॅनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांनी आवाज उठवत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वरळी पोलिसांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक केली आहे. जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे सुखलाल वर्पे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
वरळी येथील नेहरू तारांगणनजीक असलेल्या एका इमारतीच्या जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव सुरक्षारक्षकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला काठीने अमानुष मारहाण केली. दरम्यान एकाने ही घटना घडताना पाहिली आणि मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले. चित्रीकरण केलेला व्हिडीओ बॉम्बे अॅनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांना पाठवला. त्यानंतर विजय मोहानी यांनी व्हिडिओची दखल घेत २४ जुलैला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान जखमी कुत्र्याच्या पिल्लाला महालक्ष्मी येथील क्राऊन वेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून १ वर्षाचं पिल्लू कोमात आहे. सुरक्षारक्षकांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, वरळी पोलिसांनी जैस्वाल आणि यादव या दोघांना भा. दं. वि. कलम ४३९, ३४ आणि द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्टच्या कलम ११ आणि १ (अ) अन्वये अटक करण्यात आली. मात्र, कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.