नांदेड – शहरात एकाच एकाच दिवशी २ उच्चशिक्षित महिलांनी आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. एका महिलेने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यात काय उल्लेख केला आहे त्याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. परंतु या प्रकरणी पतीला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे नैराश्य आल्यानं डॉक्टर पत्नीनं स्वत:चा जीव संपवला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहेत.
नांदेड शहरातील वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर येथे अनुपा सागर मापारे या महिलेने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीनं आत्महत्या केल्यानं अनुपा यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीला अनुपा मापारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत निखील अर्जुन मापारे यांनी पोलिसांना माहिती दिली की, अनुपा मापारे यांच्या मैत्रिणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येपासून अनुपा या नैराश्यात होत्या. याच नैराश्यातून दुपारी त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत. ४ फेब्रुवारीला शहरातील विवेकनगर भागात शिक्षिका शिल्पा जीरोनकर यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणी शिल्पा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. या दोन्हीही आत्महत्येचा तपास पोलीस वेगवेगळ्या अँगलने करत आहेत.
अनुपा यांच्या आत्महत्येचा मैत्रिणींनाही धक्का
अनुपा मापारे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. परंतु त्यांच्या काही मैत्रिणींना अनुपा असं काही करु शकतात हे ऐकून धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अनुपा मापारे यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या काही मैत्रिणीसोबत गप्पा मारताना लोक आत्महत्या का करतात. आयुष्य एकदाच मिळतं अशा गप्पा मारल्या होत्या. आयुष्याबाबत सकारात्मक असणाऱ्या अनुपा यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याचं ऐकून त्यांच्या मैत्रिणींनाही धक्का बसला आहे.