ठाणे: हस्तीदंताच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या अमित पांडुरंग वरळीकर (४२, मुंबई) आणि सागर विजय पाटील (४०, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटींचे १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे एक हस्तीदंत हस्तगत करण्यात आले आहे.
दोघे जण कळवा भागात हस्तीदंताच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, संदीप चव्हाण, योगेश काकड, जमादार नरसिंग महापुरे आणि पोलीस हवालदार भरत आरवंदेकर आदींच्या पथकाने १६ आॅगस्ट २०२२ रोजी अटक केली.
कळवा नाका या ठिकाणी सापळा लावून अमित आणि सागर या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील पिशवीमध्ये दुर्मिळ प्रकाराचे एक हस्तीदंत आढळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या एकाच हस्तीदंताची किंमत सुमारे अडीच कोटी इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे हस्तीदंत ३४.५ सेंटीमीटर लांबीचे आणि १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करांना हे हस्तीदंत कोठून मिळाले, यामध्ये अन्य कोणत्या टोळीचा सहभाग आहे का? ते कोणाला विक्री करणार होते? या सर्व बाबींचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे.