वणी (यवतमाळ) : तालुक्यातील नेरड (पुरड) येथील एका घरावर कृषी विभागाचे यवतमाळ येथील पथक व शिरपूर पोलिसांनी संयुक्तरीत्या धाड टाकून एक लाख ८५ हजार ६१४ रुपयांचे प्रतिबंधित बोगस बियाणे जप्त केले. या प्रकरणात शंकर बाबाराव लडके याला अटक करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले सर्व बियाणे हे कपाशीचे आहे. ही कारवाई बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांना नेरडमध्ये बनावट बियाणांचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक दत्तात्रय आवारे, जिल्हा कृषी अधिकारी नीलेश ढाकुलकर, जि.प.चे कृषी अधिकारी पंकज बरडे तसेच शिरपूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई पल्लवी प्रकाश बलकी, राजू शेंडे यांना सोबत घेऊन गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नेरड येथील शंकर बाबाराव लडके यांच्या राहत्या घरी धाड टाकून घराची झडती घेतली. या झडतीत घरातील एका खोलीमध्ये पांढऱ्या पोत्यात कपाशीच्या प्रतिबंधित बियाणांचा साठा आढळून आला. या पथकाने लगेच बाबाराव लडके याला ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध शिरपूर पोलिसांनी कलम ६, ८, ९, १०, ८, १५ (१), १५ (२), १६ (१), ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.