मुंबई - कळव्यातील खारेगाव टोलनाका येथून रविवारी फॉस्फेटयुक्त कफ सिरपचा दोन लाख आठ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. रात्री सव्वाआठच्या सुमारास आॅटोरिक्षातून हा साठा नेला जात असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तो जप्त केला. तसेच याची माहिती अन्न व सुरक्षा प्रशासनाला दिली. त्यानुसार त्यांनी पुढील कारवाई करीत हा साठा घेऊन जाणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना औषध विक्री परवाना, औषधांची खरेदी व विक्री याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना, बिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे औषधे गैरमार्गाने विक्री करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही औषधे घाटकोपर येथे पुरविण्यात येणार होती.अन्न व औषध प्रशासनाचे (ठाणे) सह आयुक्त (औषध विभाग) विराज पौनिकर यासंदर्भात म्हणाले, कोडीन फॉस्फेटयुक्त कफ सिरप हे खोकल्यावरचे औषध आहे. परंतु काही लोक याचा गैरवापर करतात. हे कफ सिरप जास्त प्रमाणात घेतल्यावर एक प्रकारची गुंगी येत असल्याने याचा वापर नशेसाठीही केला जातो. औषधाचा साठा रिक्षामधून नेत असताना ठाणे पोलिसांनी पकडला. त्यानंतर पोलिसांनी एफडीएला माहिती दिली. औषधाचा साठा असल्यामुळे एफडीएने तिघांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोडीन फॉस्फेटयुक्त कफ सिरपचा नमुना हा चाचणी व विश्लेषणासाठी वांद्रे येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
...त्यानंतर होणार पुढील कार्यवाहीऔषध नियंत्रण प्रयोगशाळेकडून नमुना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यावर व अमलीपदार्थविरोधी पथक यांच्याकडून केलेल्या तपासासंदर्भात माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुढील कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व सुरक्षा प्रशासन.