मुंबई - पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून अंधेरी येथील एका सलूनला अनधिकृत बांधकाम सुरू असल्याबाबत ते बंद करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांनी सलूनवाल्याकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे समोर आल्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाचखोर अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दीपक काम करीत असलेल्या सलूनमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असून ते बंद करण्याबाबत पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे या नोटिसीच्या अनुषंगाने सलून मालकाने दीपकला संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले होते. त्यानुसार दीपक हा अमोल जाधव (वय - २९) या कनिष्ठ अभियंत्याला भेटला. तेव्हा हे प्रकरण मिटविण्यासाठी तीन लाखांची मागणी जाधवने केली. नंतर दुय्यम अभियंता आनंद नेरुरकर (वय - ३६) याने तडजोडीअंती दोन लाखांवर सौदा पक्का केला. मात्र, लाच द्यायची नसल्याने दीपकने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार चौकशीत जाधव आणि नेरुरकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने अमोल जाधव तसेच दुय्यम अभियंता आनंद नेरूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.