इंदापूर : इंदापूर शहरातील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब शेलार यांचा रविवारी (दि. १० डिसेंबर) धारदार शस्त्राने खून करून आरोपी फरार झाले होते. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी त्याच वेळी ताब्यात घेतले होते. दोन मुख्य आरोपी फरार झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मृत बाळासाहेब शेलार खून प्रकरणाच्या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी सुमीत रघुनाथ जामदार (वय २८) व नीलेश मल्हारी बनसोडे (वय २२, दोघेही रा. कसबा, इंदापूर, ता. इंदापूर) यांना इंदापूर पोलिसांनी पुण्यातून अटक करून गजाआड केले आहे.इंदापूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या तपासात त्यांच्या तांत्रिक बाबीची तपासणी करून गुन्हेगारांपर्यंत पोहोचले व पुण्यातील त्यांच्या भाड्याच्या घरातून त्या दोघांना सोमवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता अटक केली असून अजून सात आरोपींचा शोध चालू आहे. दोन गुन्हेगारांना मंगळवारी (दि. २५) इंदापूर फौजदारी विशेष न्यायालयासमोर सकाळी ११.१५ वाजता हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. २५ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार करीत आहेत. या गुन्हेगारांना इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, पोलीस निरीक्षक राम गोमरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बडे, शिरीष लोंढे, अमित चव्हाण, बापू मोहिते, जगदीश चौधर, संजय जाधव एक गुन्हे शोध पथकाने कारवाई करून अटक केली.
शेलार खून प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:09 AM