राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या डी कंपनीशी संबंधीत केलेल्या छापेमारीच्या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली होती. सलग तिसऱ्या दिवशीही १८ जणांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. ईडी आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी एनआयए मुख्यालयात बुधवारी आले होते. दरम्यान, चार दिवसांच्या चौकशीनंतर छोटा शकीलच्या दोन सदस्यांना एनआयएतडून अटक करण्यात आली आहे.
चार दिवसांच्या चौकशीनंतर दाऊदचा हस्तक छोटा शकील यांच्यात पैशाचे व्यवहार आढळून आल्यानंतर दोघांना अटक केली आहे. आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी आहेत. दोघेही डी गँगच्या टेरर फंडींगसाठी पश्चिम उपनगरातून पैसे गोळा करत होते. एनआयएचे पथक त्या दोघांना आज न्यायालयात हजर करणार आहे.नआयएकडून, सोमवारी मुंबईल्या २४ ठिकाणांसह ठाण्यातील ५ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. तसंच, दाऊदचा विश्वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह एकूण सहा जणांची चौकशी करण्यात आली होती. सलग तिसऱ्या दिवशीही या सहा जणांसह एकूण १८ जणांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. या सर्वांना गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या १८ जणांमध्ये सलीम फ्रूट, खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे. हे सर्व जण ९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात साक्षीदार किंवा निर्दोष सुटलेले आहेत. तसंच काही जण आरोपीचे नातेवाईक, डी-गँगशी जोडलेले आहेत. तपास यंत्रणा मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील आरोपींचे संबंध तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात त्यांचे मनी ट्रेल्स आणि बँक स्टेटमेंटही तपासले जात आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित काही माहिती मिळते का? या दिशेनेही ईडी अधिक तपास करत आहे.
देशभरात दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोटांचा कट दाऊद टोळीने आखला होता. लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या साहाय्याने हे स्फोट घडवून आणण्यासाठी दाऊद टोळीने मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे मुंबईतून पैसा उभा करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने हा तपास सुरू आहे. तर, दुसरीकडे एनआयए'ने सुहैल खंडवानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत त्यांची चौकशी सुरु केली आहे. खंडवानी हे शहरातील दोन महत्त्वाच्या दर्ग्याचे विश्वस्त आहेत. पण त्याचवेळी ते राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांच्या कंपनीत संचालक देखील आहेत. त्या दृष्टीनेदेखील तपास सुरू आहे.