मुंबई - मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये सचिन वाझेबरोबर आणखी दोन पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन त्यांनी त्याला पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचे समजते. हे अधिकारी क्राइम ब्रँचमधील असून, यापैकी एकाने वाझे मनसुखसमवेत प्रवास करीत असताना त्याच्या गाडीला गायमुख ते ठाणे खाडीपर्यंत एस्कॉर्ट केल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकजण ठाण्यातील असून, लवकरच त्यांना चौकशीसाठी बाेलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Two more officers involved in Mansukh Hiren's murder? On the NIA's radar)वाझे व मनसुख ज्या गाडीत बसले. त्यामध्ये मनसुखची हत्या करण्यात आली, त्या गाडीला रस्त्यात नाकाबंदीमध्ये कोणी अडवू नये म्हणून पोलीस निरीक्षक त्याच्या पुढे गाडीतून प्रवास करीत होता. ४ मार्चला मनसुखची हत्या झाली, त्यारात्री एका क्राइम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाला वाझेने सीआययूच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगून आपला मोबाइल त्याच्याकडे दिला होता. कोणाचा फोन आल्यास वाझे बिझी आहेत, असे त्याला सांगण्यास वाझेने सांगितले होते. काझी, ओव्हाळ यांच्यासह चौघांकडे चौकशी सुरूच सचिन वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांची सोमवारी एनआयएने पुन्हा सुमारे ५ तास चौकशी केली. वाझेकडून नष्ट केलेल्या वस्तू व अन्य वस्तूंबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. २५ फेब्रुवारीला उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिन कांड्या असलेली स्काॅर्पिओ पार्क केलेली सापडली होती. त्यानंतर २ ते ३ दिवसांतच सीआययूच्या अधिकाऱ्यांनी विक्रोळी व ठाणे येथे तपासणी केली. त्या ठिकाणच्या बंटी रेडियम या नंबरप्लेट बनविणाऱ्या दुकानात काझी व अन्य अधिकारी गेले होते. दुकानचालक सावंत याच्याकडे विचारणा करून त्यांनी त्याला सोबत नेल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आले आहे.
‘मिठी’तून मिळालेल्या वस्तूंची होणार फॉरेन्सिक तपासणीमुंबई : स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला वांद्रेतील मिठी नदीच्या पात्रातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल. त्यातील बहुतांश डाटा खराब झाला असला तरी तज्ज्ञांद्वारे त्यातील माहिती जमविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले. त्यामध्ये दोन सीपीयू, दोन हार्डडिस्क, एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट व आणि अन्य साहित्य सापडले. नदीत टाकण्यापूर्वी वाझेने ते जाड वस्तूने ठोकून खराब केले होते. त्यामुळे डाटा परत मिळविणे अडचणीचे ठरेल. त्यासाठी तातडीने फोरेन्सिक लॅबकडे पाठविला जाणार असल्याचे समजते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मिठी नदीच्या वांद्रे येथील पात्राकडे पथकाने वाझेला सोबत घेऊन मोर्चा वळविला होता. एनआयएचे एसपी विक्रम खलोट यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यात आला.