ठाणे - शहापूरातून येऊन ठाण्यात मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या महेश दशरथ हरणो (19) आणि अर्जुन उर्फ बाळा रघुनाथ दिनकर (22) या दोन सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाणे नगर पोलिसांनीअटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी गुरुवारी दिली. दोघांपैकी अजरून हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचा मित्र अजय शेळके (रा. भिवंडी) याच्या मदतीने ग्रामीण परिसरातही त्याने मोटारसायकली चोरल्याची त्याने कबूली दिली.
विक्रोळी येथील रहिवाशी किरण गांगुर्डे (25) यांनी त्यांची मोटारसायकल ठाण्याच्या खारटन रोड येथील महात्मा फुले नगर भागात उभी केली होती. तिथून ती चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 17 सप्टेंबर 2019 रोजी दाखल केली होती. ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे, नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणोनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने शिताफीने तपास करुन महेशला 27 सप्टेंबर रोजी तर अजरून याला 29 सप्टेंबर रोजी शहापूर येथून अटक केली. दोघांनाही 2 ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. चोरलेल्या मोटारसायकलचे चेसिस क्रमाक आणि वाहनाचा क्रमांक यामध्ये फेरफार केल्याचीही त्यांनी कबूली दिली. त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांच्या दोन लाख 40 हजारांच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली कोणाच्या मालकीच्या आहेत. याचा तपास पोलिसांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचीही मदत घेतली. यातील फरार आरोपी अजय शेळके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याचे बुरसे यांनी सांगितले.