राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात अमृतकौर हॉस्पिटलमध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली. या हॉस्पिटलमध्ये झालेल्या दुर्घटनेत माता आणि बालक कक्षातील NICU मध्ये तापमान वाढीमुळे २ चिमुकल्याचा जीव गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटल प्रशासनात खळबळ माजली. सध्या या घटनेची चौकशी सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे. मात्र मृत चिमुरड्यांच्या पालकांचा हॉस्पिटलमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिशु नर्सरीच्या एका वार्मरमध्ये सोमवारी अचानक तापमान वाढ झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. ज्यामुळे NICU मध्ये असलेल्या नवजात बालकांची तब्येत बिघडली. घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती हॉस्पिटलला प्रशासनाला देण्यात आली. ज्यानंतर पीएमओ डॉ. एसएस चौहान, बालरोग तज्ज्ञ डॉ. पीएम बोहरा, डॉ. एमएस चांदावात, डॉ. अशोक जांगिड हे उपस्थित होते. बालरोग तज्ज्ञांनी २ चिमुकल्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले परंतु दोघांचा जीव वाचवण्यात अपयश आले.
या दुर्घटनेनंतर इतर बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील सर्वांची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टर म्हणाले. तर सतर्कता बाळगत एमसीएच विंगमध्ये पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही मृत बालकांचे मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले आहेत. बक्ता येथील पूजा या महिलेने ७ एप्रिलला एका मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून ती NICU मध्ये भरती होती. तसेच रामपुरा खरवा येथील रहिवासी माया यांनी १४ एप्रिलला एका मुलाला जन्म दिला होता. दोन्ही बालके एकाच वार्मर दाखल होती. काही क्षणाआधीच दोन्ही बालकांच्या आईने मुलांना दूध पाजून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर इतर बालकांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. या दुर्घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोलीस दल तैनात करण्यात आला आहे.