मीरा रोड : मीरा रोडच्या हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या उच्छादाविरोधात रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता काशिमीरा पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ८० हजारांचे कोकेन जप्त केले आहे. याआधीही पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना विविध गुन्ह्यांत अटक केली होती.हाटकेश परिसरात काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. रात्रभर चालणारा धिंगाणा, बेकायदा बार, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी विरोधात रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा आंदोलने केली, पोलिसांकडे तक्रारी, निवेदने दिली आहेत.रहिवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर भार्इंदर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथे छापा घालून कारवाया सुरू केल्या आहेत. २५ जानेवारीला पाच जणांना अटक करून अडीच लाखांचे कोकेन व पावणेतीन लाखांचे आठ मोबाइल जप्त केले होते. मुंबई पोलिसांनीही येथून नायजेरियन नागरिकांना गंभीर गुन्ह्यात अटक केली होती.येथील नायजेरियन नागरिकांचा ठोस बंदोबस्त करावा, म्हणून शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी शिवसेना व रहिवाशांच्या वतीने आंदोलनाचा इशारासुद्धा नुकताच दिला होता. त्यावर काशिमीरा पोलिसांनी नायजेरियन नागरिकांवर कारवाई सुरू असल्याचे आश्वासन देत आंदोलन करू नये, असे पत्र दिले होते.पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक दत्ता लोंढे, उपनिरीक्षक प्रकाश गोसावी व क्रांती पाटील, काशिमीरा, मीरा रोड, नयानगर पोलिसांनी मिळून शनिवारी सायंकाळी हाटकेश येथे नाकाबंदी करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली.अॅचिपाँग इमेन्युअल (३७) व ओदोई ख्रिस्तोपर टोनी (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मूळचे आफ्रिकेच्या घाना येथील रहिवासी असून सध्या हाटकेशच्या थ्रीडी क्रिएशनशेजारी राहत होते. त्यांच्याकडून एक लाख ८० हजार किमतीचे १८ ग्रॅम कोकेन, दोन मोबाइल व इलेक्ट्रीक वजनकाटा जप्त केला आहे.
कोकेनसह दोन नायजेरियन अटकेत, मीरा रोडमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 4:11 AM