मुंबई : कोकेनच्या तस्करीप्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना शुक्रवारी कलिना विद्यापीठ परिसरातून अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष आठने ही कारवाई केली आहे. इझे इझेकील नजोकु आणि नाचकू पायस अशी अटक करण्यात आलेल्या दुकलींची नावे आहेत.दोन नायजेरियन उपनगरात कोकेनची विक्री करतात, अशी माहिती कक्ष आठचे प्रमुख अरुण पोखरकर यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार, पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश विचारे यांच्या पथकाने विद्यापीठ परिसरात गुरुवारी रात्री सापळा रचला. त्यावेळी हे दोघे परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना दिसले.खबरीने केलेल्या वर्णनावरून तेच ते दोघे असल्याचे या पथकाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी नजोकू आणि पायसला ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली. दोघांकडून एकूण २७ ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. याची बाजारातील किंमत १ लाख ६२ हजार रुपये असल्याचे तपास अधिका-याकडून सांगण्यात आले.दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १६ मे, २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघांनी अमली पदार्थकुठून आणले, याबाबत चौकशी सुरू आहे.
कोकेन विक्रीप्रकरणी दोन नायजेरियन अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 2:35 AM