भंडारा - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Hospital) दहा बालकांच्या मृत्यू प्रकरणी (Child death) दोन नर्सवर भंडारा पोलीस ठाण्यात रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल ४० दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. (Two nurses charged in Bhandara fire case)
शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके असे गुन्हा दाखल झालेल्या नर्सची नावे आहेत. याप्रकरणी साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली. भंडारा सामान्या रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणात आतापर्यत अकस्मात मृत्यूची नोंद होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीही करण्यात आली. त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सकासह सात जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता.
या प्रकरणात दोन्ही नर्सने अटकपूर्व जामिनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी सुनावनी होणार आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.