चोपडा जि.जळगाव : पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना आपण पकडले जाऊ, या भीतीने दुचाकीवरील दोन दोन तरुण आपल्याकडील तीन गावठी पिस्तूल असलेले गाठोडे पोलिसाच्या अंगांवर फेकून पसार झाले. ही घटना नागलवाडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडली. या गावठी पिस्तूलाची किंमत ९० हजार रुपये आहे.
चोपडा -नागलवाडी रस्त्यावर नागेश्वर मंदिराजवळ शहर पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी एका मोटारसायकलवर दोन जण येताना पोलिसांना दिसले. त्यांनी या मोटारसायकलस्वारांना थांबण्याचा इशारा केला. त्याचवेळी मागे बसलेल्या एकाने गोणपाटाचे गाठोडे पोलिसांच्या अंगावर फेकले आणि दुचाकीने ते सुसाट वेगाने वैजापूर गावाकडे पसार झाले.
पोलिसांनी गाठोड्याची तपासणी केली असता त्यात मक्याच्या कणसाखाली नव्वद हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी बनावटीच्या पिस्तूल, दहा हजार रुपये किंमतीचे मॅगझीन, वीस हजार रुपये किंमतीचे वीस जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांतकुमार जगदेव हे पुढील तपास करीत आहेत.