बारामती : बारामती तालुक्यातील बड्या उद्योजकासह त्यांच्या मावस भावाच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने हा प्रकार उघड झाला आहे.बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. संग्राम सोरटे हे मगरवाडीतील नवनाथ उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सोरटे यांनी याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरवातीला जयचंद जाधव याला अटक केली.जाधव याने सचिन सोरटे याचे नाव सांगितले.त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न,कट रचणे तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. उद्योजक सोरटे यांचे बंधू प्रवीण व संगीता नाझीरकर यांचे भागीदारीत अनेक व्यवसाय भागीदारीत होते. नाझीरकर या नगरविकास खात्याचे उपसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी आहेत.सोरटे व नाझीरकर कुटुंबात व्यावसायिक मतभेद झाले होते. तसेच संग्राम सोरटे यांचे चुलत चुलते श्रीपाल आप्पासो सोरटे (रा. सोरटेवाडी) आणि सचिन व विकास सोरटे यांचेही दिवाणी स्वरुपाचे दावे बारामती न्यायालयात प्रलंबित आहेत. दोघा आरोपींनी संग्राम सोरटे यांना रिव्हॉल्व्हरने तर त्यांचे मावस भाऊ अॅड. प्रसाद खारतोडे यांना कोयता व तलवारीने मारण्याचा कट रचला होता. उद्योजक सोरटे यांचा मगरवाडीतील बंगला, नवनाथ मिल्कचे कार्यालय, करंजेपूल येथील नवनाथ पतसंस्थेचे कार्यालय या ठिकाणी आरोपींनी रेकीही केली होती. अॅड. खारतुडे यांचा मेडद येथील शेतात जावून पाठलाग करण्यात आला होता. या घटनेचा सुगावा लागताच सोरटे व खारतुडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदीप जाधव,सुरेंद्र वाघ,स्वप्नील अहिवळे,संदीप कारंडे, पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर यांनी ही कारवाई केली.
बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 5:48 PM
व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देबारामती गुन्हे अन्वेषण पथकाने आणला प्रकार उघडकीस