अमरावती : शहरातील मंदिरामधील दानपेटी व घरफोडी करणारे दोघे जण गजाआड करण्यात गुन्हे शाखेला यश आले. दोन्ही आरोपींनी शहर आयुक्तालयातील पाच गुन्हयांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ५ जानेवारी रोजी ही कार्यवाही करण्यात आली. आकाश प्रकाश रंगारी (रा. अनंतविहार, केवल कॉलनी अमरावती) व रामेश्वर उर्फ बबलु दामोधर आठवले (रा. कुंड सर्जापुर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आकाश हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.
मंदिरातील चोरी तसेच घरफोडी संदर्भात रेकॉर्डवरिल गुन्हेगारांबाबत माहिती घेत असताना रेकॉर्डवरिल गुन्हेगार आकाश रंगारी हा साथीदार रामेश्वर आठवले याच्यासह आयुक्तालय हद्दीत मंदीरात चोरी व घरफोडीचे गुन्हे करित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. सबब, आकाश याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणण्यात आले. पुढे रामेश्वर आठवले याला देखील अटक करण्यात आली. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंद तीन व नागपुरी गेट व वलगाव हद्दीतील एक अशा पाच गुन्हयांची कबुली दिली. नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या हद्दीत सुध्दा चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले. अटक आरोपींकडून आयुक्तालयातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यांनी केली कार्यवाही
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचे आदेशाने व गुन्हे शाखेचे निरिक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक पंकजकुमार चक्रे, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, दिनेश नांदे, विशाल वाकपांजर, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम चालक अमोल बहाद्दरपुरे यांनी केली.