दयानंद पाईकराव, नागपूर: घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक करून ४ गुन्हे उघडकीस आणत ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान आरोपींचा एक साथीदार अद्यापही फरार आहे.
मानव उर्फ मण्या अशोक शेवारे (२०, रा. पॉवर हाऊसजवळ घर संसार सोसायटी, हिवरीनगर नंदनवन) आणि कुणाल उर्फ भुऱ्या भैयालाल वानखेडे (१८, रा. सुरजनगर, वाठोडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार सुरज चाैबे (२१, रा. हिंगणा टी पॉईंटजवळ) हा अद्यापही फरार आहे. अंकित खुशाल माहेश्वरी (३६, रा. संकुल अपार्टमेंट, राधाकृष्ण सोसायटी, नरेंद्रनगर) यांचे बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्री कॉम्प्लेक्स समोर पुजा होम सोसायटी येथे ऑफीस आहे. १६ फेब्रुवारीला दुपारी ४ दे १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या दरम्यान ते ऑफीसला कुलुप लाऊन घरी गेले.
अज्ञात आरोपीने त्यांच्या ऑफीसचे कुलुप तोडून ऑफीसमधील लॅपटॉप, बॅग, स्पिकर व रोख १० हजार असा एकुण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. माहेश्वरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट चारचे अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत असताना त्यांना चांदमारी भवानी मंदिराजवळ दुचाकी क्रमांक एम. एच. ३१, एफ. एम-३२८५ सह दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांना पाहून ते पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आपला साथीदार सुरजसोबत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दुचाकी, लॅपटॉप, कि पॅड, चार्जर, माऊस, तीन पेन ड्राईव्ह, तांब्याची तार, दोन मोबाईल व रोख १४०० असा एकुण ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी वाठोडा, हुडकेश्वर, नंदनवन ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.