पुणे : सिग्नल तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार पुणे-सातारा रोडवरील पुष्पक मंगल कार्यालय चौकात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला़.याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. फरहान रोशन खान (वय २०), कुरेश रफिक खाटिक (वय १८, दोघे रा़. पृथ्वी पार्क, कोंढवा, मूळ रा़. भुसावळ, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी सहकारनगर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई व्ही़. एम़. येवले यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की येवले शुक्रवारी पुणे-सातारा रोडवरील पुष्पक मंगल कार्यालय चौकात वाहतूक नियमन करीत होते़. त्यावेळी हे दोघे जण चौकातील सिग्नल तोडून कात्रजच्या दिशेने वेगाने जात होते़. तेव्हा येवले रस्त्याच्या मधोमध आले व त्यांनी दोघांना थांबण्याचा इशारा केला़. तरीही त्यांनी मोपेड न थांबविता रस्त्याच्या विरुद्ध दिशेला स्वारगेटच्या दिशेने यूटर्न घेऊन पळून जाऊ लागले़. त्यावर त्यांनी मोपेडच्या पाठीमागील कॅरिअरला पकडून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़. वाहतूक पोलिसांनी आपल्या मोपेडचे कॅरिअर पकडले असल्याचे समजल्यावरही त्यांनी वेगाने गाडी चालविली़. त्यामुळे येवले मोपेडबरोबर भापकर पेट्रोल पंपापर्यंत फरफटत गेले़. पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ .
वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 7:56 PM