डोंबिवली - ताडीचे अतिसेवन दोन तरूणांच्या जीवावर बेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री 11 च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगावात घडला. सचिन अशोक पाडमुख (वय 22) आणि स्वप्नील बबन चोळखे (वय 30) अशी दोघा मृतांची नावे असून यातील स्वप्नील हा ट्रॅफीक वॉर्डन होता. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी ताडी केंद्र चालविणा-या रवी बथणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो पसार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.
सचिन आणि स्वप्नील असे दोघेजण अन्य दोघा मित्रंसमवेत पश्चिमेकडील अण्णानगर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गावदेवी मंदिर जवळ असलेल्या कोपरगावातील एका ताडी विक्री केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी सचिन आणि स्वप्नीलने ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांना त्रस झाला. त्यांची प्रकृती ढासळल्याने दोघांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतू ताडीच्या अतिसेवनामुळे त्यांच्या छातीवर दाब आला आणि त्यात हदयविकाराचा झटका येऊन दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहीत मिळताच विष्णुनगर पोलीस ताडी विक्री केंद्रावर पोहोचले. परंतू तत्पुर्वीच केंद्र चालविणारा रवी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान डोंबिवलीचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी वपोनि भालेराव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहीती घेतली. घटनेबाबत खेद व्यक्त करताना बेकायदेशीरपणो सुरू असलेल्या केंद्राबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. जास्त नशा येण्यासाठी ताडीमध्ये मोठया प्रमाणात केमिकल मिसळले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.अवैधपणे ताडीची विक्रीदरम्यान संबंधित ताडी विक्री केंद्र हे बेकायदेशीर होते. अवैधरित्या सुरू असलेल्या या केंद्राला कोणाचा आशिर्वाद होता? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित झाला आहे.ताडीच्या नमुन्यांची होणार तपासणीताडीच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू ओढावला असा अंदाज व्यक्त केला जात असलातरी त्यांनी प्राशन केलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याची माहीती वपोनि भालेराव यांनी दिली. नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
लवकरच कामावर रूजू होणार होतास्वप्नील हा 2015 पासून डोंबिवली वाहतूक विभागात कार्यरत होता. परंतू संधीवाताच्या त्रसामुळे तो दिड महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होता. लवकरच तो कामावर रूजू होणार होता. परंतू सोमवारी त्याचा मृत्यू ओढावला. विवाहीत असलेल्या स्वप्नीलच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि पाच वर्षाची मुलगी आहे. तर सचिन हा अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ बहीण आहेत. घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.