जळगाव जामोद : नगर परिषद जळगाव जामोद अंतर्गत केलेल्या पथदिव्यांच्या देखभाल - दुरुस्तीच्या कामाचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे बिल तसेच तक्रारदार यांनी स्वतः केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगाव जामोद नगर परिषद मुख्याधिकाऱ्यासह विद्युत पर्यवेक्षकास १३ डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले.
आरोपी मुख्याधिकारी डोईफोडे यांची संबंधित पथकाने पडताळणी केली असता त्यांनी लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन लाच दीपक शेळके याच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरून सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली. आरोपींना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदेचा विद्युत पर्यवेक्षक आरोपी दीपक कैलास शेळके (वय २० वर्षे) याने स्वतःसाठी ६ हजार रुपये व मुख्याधिकारी आकाश अविनाश डोईफोडे (वय ३२ वर्ष) याच्यासाठी ६ हजार रुपये असे १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोसले, सापळा पथकातील एएसआय भांगे, पोहेकॉ विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी, नितीन शेटे, अर्षद शेख यांनी धाड टाकून आरोपींस रंगेहाथ पकडले व कारवाईनंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.