पुणे : रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे़. पोलीस हवालदार एस. बी. घोडके (नेमणूक स्वारगेट वाहतूक विभाग) आणि किसन धोंडिबा गिरमे (नेमणूक शिवाजीनगर वाहतूक विभाग) अशी त्यांची नावे आहेत़ विशेष म्हणजे दंडाची रक्कम कमी का घेतली अशी विचारणा करणाऱ्या महिलेला गिरमे यांनी तुम्ही स्त्री असल्याचे २०० रुपये कमी केले़ ते दुसऱ्यांकडून वसुल करतो, असे धक्कादायक विधान केले होते़. एस. बी. घोडके हे ९ डिसेंबर रोजी शंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज चौकात नेमणूकीवर होते़. त्यांनी एका अॅक्टीव्हा चालकास थांबवून त्याच्यावर चलन कारवाई न करता बाजूला झाडाजवळ नेऊन गैरकृत्य केले़. त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन चलन न करता सोडून दिले़ वाहतूक शाखेची प्रतिमा मलिन करणारी हे कृत्य असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे़. किसन गिरमे हे ६ डिसेंबर रोजी टेम्पो आॅपरेटर म्हणून शिवाजीनगरला नेमणूकीला होते़. त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी साखर संकुलजवळून नो पार्किंगमधील एक दुचाकी उचलली़. ही बाब दुचाकीचालक महिलेला समजल्यावर त्या शिवाजीनगर वाहतूक शाखेत गेल्या़. त्यांना गिरमे यांनी त्यांना एक हजार रुपये दंड असल्याचे सांगून एका पुस्तकामध्ये त्यांचे नाव व गाडीचा नंबर यांची नोंद घेऊन त्यांच्याकडून ८०० रुपये स्वीकारले़. त्यांना कोणतेही चलन दिले नाही़. त्यावर या महिलेने एक हजार रुपये दंड आहे तर तुम्ही ८०० रुपये का घेतले असे विचारल्यावर गिरमे यांनी त्यांना तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. या महिलेला कोणतीही पावती न दिल्याने त्यांनी तक्रार केली़. त्याची दखल घेऊन पोलीस सेवेस अशोभनिय वर्तन केल्याने गिरमे यांना निलंबित करण्यात आले आहे़.
चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 4:03 PM
तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़.
ठळक मुद्देशंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज चौकातील बातमी कोणतीही पावती न दिल्याने तक्रार