वसई - उत्तर प्रदेशातील कुख्यात 'महाकाली' टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर नालासोपारा येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील भदोई आणि इतर जिल्ह्यात महाका्ली टोळी सक्रीय आहे. या टोळीतील दोन गुंडावर वसईतील वालीव आणि तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना या टोळीतील गुंड वसई पूर्वेकडील चिंचोटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक या गुंडांना पकडण्यासाठी गेले असता गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात शरद पाटील आणि अमोल कोरे हे दोन पोलीस जखमी झाले. मात्र त्यांनतर पोलिसांनी हल्ला कऱणाऱ्या आशुतोष मिश्रा (२३) व दिपक मलीक (१८) आणि शिवम तिवारी (१९) या तीन गुंडांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तुले, एक गावटी बनावटीचा कट्टा, ६ जिवंत काडतुसे अशी प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आले आहे. आशुतोष मिश्रा आणि दिपक मलीक हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात वसईतील वालीव तुळींज तसेच मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.