मुंबई : गुजरातच्या व्यावसायिकाकडून १३ लाख उकळण्यासाठी खोटी धाड टाकत फसवणूक करणाऱ्या मालवणी पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे आणि पोलीस खात्यातील सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला कॉन्स्टेबल डेव्हिड बनसोडे यांना अप्पर पोलीस आयुक्तांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. हे दोघे बनावट नोटांचा व्यवसाय चालवत असून, अनेकांना गंडा घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा धुळ्याचा रहिवासी असलेला आरोपी सोनवणे हा सध्या फरार आहे. तपासात पोलिसांना असेही आढळून आले की, आरोपी सोनवणे याने २०१७ ते २०१९ या वर्षात सुमारे १९ प्रकरणे, ८ विशेष प्रकरणे आणि २७ अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण केला नाही. त्याचा शोध घेत मालवणी पोलीस धुळ्यापर्यंत गेले. मात्र, तो वडिलांसह तिथून फरार झाला. यज्ञेश कृष्णकुमार पंड्या (२८) असे तक्रारदाराचे नाव असून, त्यांच्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी सोनवणे आणि बनसोडे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला. यापूर्वी पोलिसांनी आरोपी शबाज संघवानी (२५) आणि आबिद इस्माईल शाह (३३) या मालवणीच्या रहिवाशांना अटक केली होती. मात्र, अन्य आरोपी जयसिंग राठोड, आसिफ संघवानी आणि रफिक भाटी यांना अद्याप अटक झालेली नाही.
काय होते प्रकरण?
जामनगरचे रहिवासी पंड्या यांना व्यवसायात नुकसान झाल्यानंतर ते भरून काढण्यासाठी सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपी जयसिंग राठोड आणि राजन दवे यांना भेटायला ते मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी एक स्कीम पंड्यांना सांगत दहा हजार रुपयांचे बनावट चलन बँकेत जमा करण्यास सांगितले. बँक ते स्वीकारेल, असेही त्यांना पटवून दिले. तसेच त्या दोघांनी पंड्यांना समजावले की जर त्यांनी १५ लाख रुपये दिले तर ते त्यांना १ कोटी रुपयांचे बनावट चलन देतील. २५ ऑगस्ट रोजी आरोपीने पंड्या यांना १३ लाख रुपये घेऊन मालवणीला बोलावले.
ते पैसे घेऊन गेले, तेव्हा दोन्ही आरोपी एका कारमध्ये बसले होते. तेव्हा त्यावेळी सोनवणे आणि बनसोडेने त्याठिकाणी धाड टाकत १३ लाख ताब्यात घेतले मात्र, पंड्या यांना पळून जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर पंड्या यांनी राठोडला संपर्क केला. तेव्हा इतरांना पोलिसांनी पकडले आहे, असे त्याना सांगण्यात आले. मात्र, पंड्यांना संशय आल्याने त्यांनी मालवणी पोलिसांत धाव घेतली.