मंगेश कराळे
नालासोपारा- वसईच्या भूमीअभिलेख कार्यालयातील लिपिक आणि दोन खाजगी आरोपींना ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पालघर अँटी करप्शनने मंगळवारी दुपारी पकडल्याची घटना घडली आहे. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदारांचे सासरे यांचे जमिनीचे शासकीय मोजणीचे कागदपत्रे मिळणेसाठी तसेच मोजणीचे रिपोर्ट कोर्टात सादर करण्यासाठी यातील आरोपीत कैलास जोगी (४२) (खाजगी इसम) यांनी आरोपी वसईच्या भुमि अभिलेख कार्यालय, वर्ग - 3 येथील शिरस्तेदार राजेंद्र संखे यांचेकरिता ५० हजार रुपयांची सोमवारी लाचेची मागणी केली. तडजोड अंती ४५ हजार रुपयांत हे मान्य करण्यात आले. परंतु तक्रारदार यांना आरोपीला यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी पालघरच्या लाचलुचपत शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केली असता सदर कामासाठी व लाचेची रक्कम स्वीकारण्यास आरोपी खाजगी रिक्षाचालक रमण गोली (५०) हा प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी दुपारी नालासोपारा पूर्वेकडील गौराईपाडा येथील रावजी चहा सेंटर याठिकाणी सापळा लावून ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सदर आरोपी विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालघर लाचलुचपत खात्याचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप यांनी लोकमतला सांगितले. तसेच नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी केले आहे.