नवी मुंबई : खैरणे गावामध्ये वेल्डिंगचे काम करणाऱ्या व्यापा-याला धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी शिवले प्रेमचंद वालमिके व वसिम सुभान शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.वेल्डिंगचे काम करणा-या मोहम्मद शहाबुद्दीन फितीउल्ला शेख यांना तीन अनोळखी नंबरवरून खंडणीसाठी फोन येऊ लागले होते. प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये दिले नाहीत, तर जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याविषयी त्यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. आरोपींनी शेख यांना गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोरील बालाजी मल्टिप्लेक्सजवळ बोलावले होते. त्या ठिकाणी पैसे स्वीकारत असताना त्याला अटक केली आहे. आरोपीकडून खंडणीसाठी स्वीकारलेले पैसेही हस्तगत केले आहेत.आरोपींविरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. भाऊ अजारी असल्यामुळे पैसे गोळा करण्यासाठी खंडणी मागितल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.या गुन्ह्याचा तपासामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गवळी, उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्यासह हवालदार औदुंबर जाधव, योगेश पाटील, गणेश गीते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन खंडणीखोरांना अटक, कोपरखैरणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:37 AM