अंबरनाथ: अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. डुप्लिकेट रेशनकार्ड आणि ऑनलाईन नोंदणी यासाठी प्रत्येक कार्डामागे ५०० रुपयांची लाच घेताना या दोन क्लार्कना ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या. अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात.
कुठल्याही लहानमोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्यातच जावसई भागात राहणारे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू सोमा यांनी त्यांच्या भागातील दोन जणांचे फाटलेले रेशनकार्ड नव्याने तयार करण्यासाठी, तर एक रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिले होते.
या प्रत्येक कार्डासाठी ५०० रुपये याप्रमाणे १५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. खिडकी क्रमांक २ वरील क्लार्क प्रताप ब्रह्मनाद आणि खिडकी क्रमांक ३ वरील क्लार्क सुनीता हिंदळे यांनी ही लाच मागितली होती. त्यामुळे राजू सोमा यांनी याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज सापळा रचून अँटी करप्शन विभागाने या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यानंतर आता तरी अंबरनाथच्या रेशनिंग ऑफिसमधल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होते.