कल्याण - काही महिन्यांपूर्वी वाईन शॉप बंद करून घराकडे जाणाऱ्या वाईन शॉपमधील कामगाराचा पाठलाग करत त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील साडे तीन लाखांची रोकड दरोडेखोरांनी लांबवली होती. या प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. अखेर या सहामधील दोन आरोपींना अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आले आहे. शैलेश रॉय व आनंत पवार असे या दरोडेखोरांची नावे असून त्यांचे दोन साथीदार कोळशेवाडी मध्ये दाखल गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. तर उर्वरित दोन जण फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
डोंबिवली येथील विभूती वाईन शॉप मधील दिवसभरात जमलेली सुमारे साडे तीन लाखांची रोकड घेऊन वाइन शॉप मधील कर्मचारी दिलीप सावंत आपल्या मालकाला देण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. यावेळीं त्यांच्यावर पाळत ठेवून असणारे पाच दरोडेखोर त्यांचा रिक्षाने पाठलाग करत होते. त्यांनी सावंत यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून रोकड हिसकावून घेत तेथून पळ काढला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात पाच दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. डोंबिवली पोलीस व कल्याण गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. याच दरम्यान सदर गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीतील एक आरोपी शैलेश रॉय हा डोंबिवली रेती बंदर येथे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मारदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मगदून, पवनकुमार ठाकूर, पोलीस हवालदार भोसले, चव्हाण, घोलप, पगारे, राजपूत, पाटील, बांगरा या पथकाने रेती बंदर परिसरात सापळा रचून शैलेश रॉय याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा साथीदार अनंत पवार याला अटक केली. तर उर्वरित दोन आरोपी याआधीच कोळशेवाडी पोलिस स्थानकात दाखल गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.