लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप माचिये यांनी आपल्याच विद्युत मंडळ विभागातील कर्मचाऱ्यांकडून एक लाखाची लाच स्वीकारताना सोमवारी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दोन वरिष्ठ अधिकारीच भ्रष्टाचारी निघाल्याने या विभागाच्या अंतर्गत कारभारात काय सुरू असेल, याची प्रचीती येत असल्याची चर्चा पालघरमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पालघर विभागात अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे दोन वरिष्ठ अधिकारीच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने विद्युत महामंडळाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या विभागात कार्यरत असलेल्या बोईसर विभागातील एका सहाय्यक अभियंत्याच्या विरोधात अनेक तक्रारी किरण नगावकर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार याच्याविरोधात कारवाई करायची नसल्यास दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली होती. असा निरोप घेऊन एक नंबरचे आरोपी प्रताप माचिये यांनी तक्रारदारांची भेट घेऊन सांगितले. या भेटीअंती रक्कमेबाबत दोन लाखाच्या रक्कमेत दीड लाखाची तडजोड करण्यात आली. या तडजोडीला अधीक्षक अभियंत्या नगावकर यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे एक लाखाची रक्कम घेऊन तक्रारदार आरोपींनी सांगितलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पालघरच्या कार्यालयात आले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोपी माचिये यांनी एक लाखाची रक्कम स्वीकारल्यानंतर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलिस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस हवालदार अमित चाव्हण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दीपक सुमडा, सखाराम दोडे आदींच्या पथकाने धाड टाकून दोन्ही आरोपींना अटक केली.