- जितेंद्र कालेकर
ठाणे - बांधकाम व्यावसायिक बाबा माने यांच्या मोटारीची काच फोडल्याचा जाब विचारल्याने ओम साई प्रॉपर्टीजचा कर्मचारी अश्विन गंगाराम गमरे (२६, रा. ठाणे) याच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची नौपाडयात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर गणेश सुधाकर जाधव उर्फ काळा गण्या (३६, रा. लोकमान्यनगर, ठाणे.) याच्यावर लोकमान्यनगर भागात गोळीबार झाल्याची घटनाही गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील या दोन्ही घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पहिल्या घटनेत २१ आॅक्टोंबर रोजी पहाटे ५ ते ५.१५ वाजण्याच्या सुमारास नौपाडयातील घंटाळी रोड भागातील ओम साई प्रॉपर्टीच्या कार्यालयासमोरील कुलकर्णी हाऊस येथे दोन अनोळखींनी बांधकाम व्यावसायिक बाबा माने यांच्या मोटारकारवर दगडफेक करीत तिचे नुकसान केले. त्यावेळी ओमसाई प्रॉपर्टीजच्या कार्यालयाबाहेर तेथील कर्मचारी अश्विन गमरे हे आकाश कंदिलाची तयारी करीत होते. दरम्यान, पोटभर हॉेटेलचे वेटरच्या निदर्शनास मोटारीची काच फोडल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे वेटर आणि काच फोडणाºयांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यामुळे गमरे यांनीही या वादामध्ये उडी घेतली. त्यांनीही माने यांच्या गाडीची काच का फोडली? असा जाब त्या हल्लेखोरांना विचारला. याचाच राग आल्याने त्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी ओम साई प्रॉपर्टीजच्या कार्यालयासमोर येऊन त्यांच्याकडील पिस्टलमधून गमरे आणि त्यांच्या मित्राच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये चार ते पाच फैरी झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी गमरे यांच्या छातीमध्ये डाव्या बाजूला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३, २५ सह खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी चार पुंगळया, एक जिवंत काडतुस आणि एक काडतुसाचा पुढील भाग (शिसा) जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाह आणि निरीक्षक आनंद निकम यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
दूस-या घटनेमध्ये लोकमान्यनगरचा कुप्रसिद्ध गुंड गणेश जाधव उर्फ काळा गण्या याच्या डोक्यावर बिपीन मिश्रा आणि सौरभ शिंदे या त्याच्या पूर्वाश्रमीच्या साथीदारांनीच पैसे न दिल्याच्या रागातून गोळीबार केल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर पाडा क्रमांक येथील साईनाथ क्रीडा मंडळाच्या बाजूला असलेल्या जंगलातील नाल्याजव घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले. काळा गण्या याच्यावर २५ गुन्हे यात गंभीर जखमी झालेल्या काळा गण्या याच्यावर हाणामारी, खंडणी वसूली असे गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर बिपीन मिश्रा याच्यावरही सात ते आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.