औरंगाबाद: ३० हजारात एक लाखाच्या बनावट नोटा देणाऱ्या रॅकेटमधील दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ७ लाख १६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दिशांत राजा साळवे(२४,रा. प्रगती कॉलनी, गौतमनगर) आणि सय्यद मुसहीक अली सय्यद सादत अली(२८,रा.हैदरबाग १, देगलुर नाका, नांदेड)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आयुक्त प्रसाद म्हणाले की, दिशांत साळवे हा उस्मानपुरा परिसरात बनावट नोटांची डिलिव्हरी करण्यासाठी आल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रल्हाद शिंदे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, कर्मचारी मनोज बनसोडे, संतोष सिरसाठ, डोभाळ यांनी उस्मानपुरा परिसरात सापळा रचून आरोपी दिशांत यास सापळा रचून पकडले. त्यावेळी त्याच्याकडे १०० रुपये, २०० रुपये आणि ५०० रुपये चलनाच्या तब्बल ७ लाख १६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. यात ५०० रुपयांची ११ बंडले(प्रत्येक बंडलमध्ये १००नोटा), २०० आणि १०० रुपयांची प्रत्येकी सात बंडले मिळाली.
आरोपी साळवे यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने नांदेड येथील सय्यद मुसहीक अली यांने या नोटांचा पुरवठा केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने नांदेड येथे जाऊन आरोपी सय्यद मुसहीक यास ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याला नांदेड येथील एक जण नोटांचा पुरवठा करीत असल्याचे त्याने सांगितले. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.