मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस तिकीट विक्री केंद्रावर चोरट्यांनी ४५ लाख रुपयांचा डल्ला मारला होता. या प्रकरणी कुर्ला रेल्वेपोलिसांनी दोन संशयित रेल्वे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.लोकमान्य टिळक टर्मिनसवरील तिकीट विक्रीची रक्कम, तिकीट तपासनिसांनी विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम तिकीट विक्री केंद्रावर जमा केली होती. ती रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तपासाअंती रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दोघांना पकडले असून त्यांची चौकशी सुरू आहे. यासह पोलिसांकडून लोकमान्य टिळक टर्मिनस परिसराचा तपास केला जात आहे. तिकीट विक्री केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून अधिक तपास सुरू आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील प्रवाशांच्या तिकिटांचे तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिकीटघर येथील लोखंडी तिजोरीतून हे पैसे चोरीस गेले आहेत. याबाबत गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे.