2 Terrorist arrested, Jammu Kashmir: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशात हल्ला घडवून दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. दोन्ही दहशतवादी बारामुल्लामध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचत होते. एका दहशतवाद्याच्या माहितीनंतर नाकाबंदी करताना पोलीस सज्ज होते. दरम्यान, आझादगंज ओल्ड टाऊनजवळ बारामुल्ला पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त
पोलिसांनी सांगितले की आझादगंज बारामुल्लाच्या दिशेने येत असलेल्या दोन संशयित व्यक्तींनी अचानक त्यांच्या टीमला पाहून मागे पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पकडण्यात आले. एजन्सींनी पकडलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. झडतीदरम्यान 1 पिस्तूल, 1 मॅगझीन, 4 जिवंत काडतुसे आणि 1 ग्रेनेड जप्त करण्यात आले.
हे शहर होतं निशाण्यावर, तपासात झाला उलगडा
फैसल मजीद गनी (अब्दुल मजीद यांचा पुत्र, रा. बंगलो बाग बारामुल्ला) आणि नूरुल कामरान गनी (मोहम्मद अकबर गनी यांचा पुत्र, रा. बाग-ए-इस्लाम, ओल्ड टाऊन बारामुल्ला) अशी त्यांची ओळख पटली आहे. प्राथमिक तपासात हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या आसपास बारामुल्ला शहरात दहशतवादी कारवाया करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे हे शहर त्यांच्या निशाण्यावर होते असे तपासात उघड झाले.