पिंपरी : दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन युवकांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून चार लाखांच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी रविवारी (दि. ९) ही कारवाई केली.स्वप्निल राजू काटकर (वय १९, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी) व राहुल मोहन पवार (वय १९, रा. मधुबन सोसायटी क्रमांक २, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी उड्डाणपुलाखाली, आळंदी रोड येथे आरोपी दुचाकीसह सशंयीतरित्या थांबलेले असून ते रात्री तेथे दिसत असतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी यांना पकडले. तेव्हा त्यांच्याकडील दोन दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी त्या दुचाकी चोरून आणल्याचे उघड झाले. त्यामुळे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीन आठ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. चार लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या. भोसरी, एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून आरोपी यांनी या दुचाकी चोरल्या असल्याचे उघड झाले. यातील आठ दुचाकी चोरी झाल्याबाबत भोसरी, खडकी, भोसरी एमआयडीसी व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत दोन दुचाकींच्या मूळ मालकास संपर्क साधला असता त्यांनी तक्रार द्यावयाची नसल्याबाबत पोलिसांना सांगितले. दुसरी दुचाकी ही नागपूरची असून ती संगमनेर येथून चोरीस गेली. या दुचाकीबाबत अधिक तपास सूरू आहे.चोरलेली दुचाकी दिवसभर फिरवून रात्री भोसरी येथील उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये पार्क करून चोरटे घरी जात असत. यातील काही चोरीच्या दुचाकी आरोपी यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे समोर आले आहे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो, असे सांगून या दुचाकी त्यांनी विक्री केल्या. या दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र गावंडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चार लाखांच्या १० दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:13 PM
भोसरी, एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून आरोपी यांनी या दुचाकी चोरल्या असल्याचे उघड झाले.
ठळक मुद्देआठ दुचाकी चोरी झाल्याबाबत भोसरी, खडकी, भोसरी एमआयडीसी व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे