लातूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावातून मोटारसायकल चोरून, त्याची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पथकाने गुरुवारी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ७ मोटरसायकलींसह ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस पथकास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उदगीर ग्रामीण ठाण्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपी महाराष्ट्र- कर्नाटक सीमेलगतच्या गावात, परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह अतिशय कमी किमतीत लोकांना भूल थापा देऊन विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर आरोपीचा शोध घेतला.
दरम्यान, मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित फारुख रौफ पठाण, (वय २३, रा. जम्मूनगर बिदर गेट जवळ उदगीर) आणि शुभम दत्ता तेलंगे (वय १८, रा. निडेबन ता. उदगीर) यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी उदगीर तालुक्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून ग्रामीण भागात कमी किमतीत मोटरसायकल विकल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून सात मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघानाही अटक करण्यात आली आहे.