पुणे : दुचाकीचालकावर कारवाई न करता १ हजार रुपयांची मागणी करुन लायन्सन जप्त केले़. तसेच चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दोन वाहतूक पोलिसांना निलंबित केले आहे़. ही घटना १० जून रोजी अलका टॉकिजजवळील टिळक चौकात घडली़. पोलीस हवालदार सुनिल ज्ञानदेव डगळे आणि पोलीस नाईक निलेश रावसाहेब काळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत़. याबाबतची माहिती अशी, या दोघांची विश्रामबाग वाहतूक विभागात नेमणूक होती़. १० जून रोजी ते टिळक चौकात कर्तव्यावर असताना कृष्णा काळे हे मेसमधून जेवण घेऊन विना हेल्मेट टिळक चौकातून जात होते़. त्यावेळी डगळे आणि काळे यांनी त्यांना अडवून १ हजार रुपयांची मागणी केली व त्यांचे लायसन्स ठेवून घेऊन त्यांना जाऊ दिले़. काही वेळाने काळे हेल्मेट घेऊन आले व माझ्याकडे हेल्मेट आहे, माझे लायसन्स परत द्या, अशी विनंती केली़. त्यावरुन त्यांच्या शाब्दिक वाद झाला़. तेव्हा काळे हे तेथून दूर जाऊन मोबाईलवर चित्रण करु लागले़ हे पाहिल्यावर डगळे व निलेश काळे यांनी कृष्णा काळे यांना पकडून धक्काबुक्की करीत संभाजी चौकीत घेऊन गेले़. त्याठिकाणी त्यांनी काळे यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला़. त्यातील सीम कार्ड व मेमरी कार्ड घेतले़. त्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई अनिल जामगे यांच्याबरोबर टिळक चौकात पाठविले़ तेथे त्यांना गाडीवर बसवून फोटो काढून घेतले व त्यांच्यावर हेल्मेट कारवाई केली़. त्यानंतर कृष्णा काळे यांनी मित्रांना बोलावून चलन पेड केले़. कृष्णा काळे यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली़. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आल्यावर त्यात तथ्य आढळल्याने पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे़. तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उपायुक्त पंकज देशमुख यांनी काढले आहेत़.
पुण्यात जबरदस्तीने हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी दोन वाहतूक पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:41 AM
चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.
ठळक मुद्देदुचाकीस्वाराला केली मारहाण : सीमकार्डही घेतले काढून