वाराणसी - उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बुधवारी संध्याकाळी एका घरातून महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. आजारपणामुळे गेल्या ८ डिसेंबर २०२२ रोजी महिलेचा मृत्यू झाला, परंतु तिच्या दोन मुलींनी अद्याप तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. कुटुंब आणि समाजातील सर्व संबंध तोडून दोन सख्ख्या बहिणींनी स्वत:ला घरात कैद केले आणि आपल्या मृत आईच्या मृतदेहाचा सांगाडा वर्षभर घरात लपवून ठेवला. २७ वर्षांची पल्लवी आणि १९ वर्षांची वैष्णवी एक वर्षापूर्वी मरण पावलेल्या त्यांच्या आईसोबत राहत होत्या. पल्लवी आणि वैष्णवीची आई उषा तिवारी यांचं ८ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले परंतु या दोघी बहिणींनी त्यांच्या शेजारी आणि नातेवाईकांना आम्ही आईवर अंत्यसंस्कार केले असं सांगितले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच लंका पोलीस ठाण्याचे पोलीस बुधवारी घटनास्थळी पोहोचले.त्यांनी घराच्या तीन दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि महिलेचा सांगाडा बाहेर काढला. पोलिसांनी दोन्ही मुलींनाही घराबाहेर आणले. पुरावा म्हणून महिलेचे कपडे, चप्पल, बेडशीट, रजई आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार?
ही घटना वाराणसीच्या लंका पोलीस स्टेशन हद्दीतील मदरवा येथे घडली. लंका पोलिस स्टेशनचे प्रभारी शिवकांत मिश्रा यांनी सांगितले की, मदरवा- सामनघाट येथील रहिवासी ५२ वर्षीय उषा त्रिपाठी यांचे गेल्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. या मृत महिलेचा नवरा २ वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता आणि पत्नीच्या मृत्यूनंतरही तो घरी आला नाही. तर महिलेच्या दोन मुली - पल्लवी त्रिपाठी आणि वैष्णवी यांनी आईच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो मृतदेह घरातच कोंडून ठेवला.
तीन कुलूप तोडून सांगाडा बाहेर काढला
दोन्ही मुलींनी आपल्या आईचा मृतदेह रजाईच्या आत लपवून ठेवला होता. मृतदेहाला किडे पडलेले पाहून ते हाताने काढून बाहेर फेकायचे. दुर्गंधी आल्यावर त्याने घराच्या गच्चीवर जाऊन जेवण केले. दोघीही जवळपास एक वर्ष महिलेच्या मृतदेहासोबत राहत होत्या. या प्रकरणाची माहिती मिळताच लंका पोलीस ठाण्याचे पोलीस बुधवारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराच्या तीन दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. महिलेचा सांगाडा बाहेर काढला आणि दोन्ही मुलींनाही ताब्यात घेतले. पुरावा म्हणून महिलेचे कपडे, चप्पल, बेडशीट, रजई आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. लंका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुलींची मानसिक स्थिती ठीक नाही.
मुलगी म्हणाली- पैसे नव्हते, म्हणून अंत्यसंस्कार केले नाही
जबाबात म्हटल्यानुसार, दोन्ही मुलींनी सांगितले की ८ डिसेंबर २०२२ रोजी आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. आईला उलट्या व्हायच्या. पैसा आणि साहित्या नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. मोठी मुलगी पल्लवी २७ वर्षांची आहे तर धाकटी मुलगी वैष्णवी १९ वर्षांची आहे. पल्लवीकडे पदव्युत्तर पदवी आहे, तर वैष्णवी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. दोन्ही मुलींची मनस्थिती ठीक नाही. सध्या या दोघींना मिर्झापूर येथील रहिवासी त्यांची मावशी आणि काका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. काका धर्मेंद्र यांच्या तक्रारीवरून उषाच्या सांगाड्याचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे.