मुंबई - विक्रोळी येथे नाकाबंदीदरम्यान बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या मोहम्मद हुसेन शेख आणि इकबाल सय्यद यांनी जोरदार धडक देऊन वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल चैतन्य रजपूत हे जखमी झाले. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी मोहम्मद हुसेन शेख आणि इकबाल सय्यद या दोघांना अटक केली. मोहम्मद याच्याकडे वाहनपरवाना नव्हता म्हणून ते थांबत नसल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांना मारहाण, सरकारी कामात अडथळा, विना परवाना वाहन चालविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून विक्रोळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
विक्रोळीतील पूर्व द्रुतगती महामार्गावर गोदरेज सोप गेटनजीक नाकाबंदी लावली होती. कॉन्स्टेबल चैतन्य रजपूत हे वाहन चालकांची तपासणी करीत होते. दरम्यान, एमएच-०३-सिक्यू- १९७० या मोटारसायकलवरून मोहम्मद आणि त्याचा मित्र सय्यद भरधाव वेगात येत असल्याचे रजपूत यांनी पहिले. बॅरिकेट्स पाहूनही ते वेग कमी करतील असे रजपूत यांना वाटले. मात्र त्यांच्या दुचाकीचा वेग कमी नव्हता. शेवटी रजपूतने दोघांना मोटारसायकल थांबविण्यास सांगितले. मात्र, दोघे पळण्याचा प्रयत्न करीत असताना रजपूत यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकल त्यांच्या अंगावर घातली. त्यामुळे रजपूत यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच रजपूत यांना धक्काबुक्की करू लागले. यावेळी इतर सहकारी पोलिसांनी धाव घेत दोघांना पकडले.