नितिन पंडीत
भिवंडी - अनलॉक काळात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊन दिवसागणिक ८ ते १० दुचाकी चोरीच्या घटना भिवंडी परिसरात घडत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पोलीस गस्त सुरु करण्यात आली आहे. अखेर पोलिसांच्या नाकेबंदीला यश येऊन दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांची दुकली शांतीनगर पोलिसांनी गजाआड केली आहे. या चोरट्यांकडून विविध कंपनीच्या तब्बल १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सोमवारी दिली आहे.
मोहमद सरजील सिराज अहमद मोमीन (वय १९ रा. खान कंम्पाउन्ड, भिवंडी) फिरोज हबीब शेख उर्फ लाला (वय २५ रा. गैबीनगर, भिवंडी ) असे गजाआड केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरट्याचा शोध सुरु असतानाच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहमद सरजील सिराज अहमद मोमीन आणि फिरोज हबीब शेख उर्फ लाला गेल्या काही दिवसापासून कामधंदा नसतानाही मौजमजा करीत असल्याची खबर पोलिसांना लागली. या आधारावर दोघानांही नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७ व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ११ गुन्हे असे एकुण १८ गुन्हे घडकीस आणले आहेत.
चोरट्याच्या दुकलीने अनलॉक कालावधीत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, नौपाडा हद्दीत २, भोईवाडा १ , कोनगाव १, निजामपुरा १, कासारवडवली १, खडकपाडा १, बाजारपेठ १, शिळडायघर १ अश्या एकूण १४ दुचाक्यासह ४ ऑटो रिक्षा लंपास केल्या होत्या. या चोरट्याकडून १८ गुन्हे उघडकीस आणत आतापर्यत एकुण ६ लाख ७६ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.