जळगाव : गावाला आल्यानंतर औरंगाबाद येथील वाळूजमधील कंपनीत कामाला जाताना रस्त्यात संधी मिळेल तेथून दुचाकी चोरणाऱ्या जमील आयुब शेख (२४, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) याच्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भांडाफोड केला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आणखी तपासासाठीपोलिसांचे एक पथक त्याला घेऊन औरंगाबाद येथे गेले आहे.
पिंपळगाव येथील जमील हा औरंगाबाद येथे कंपनीत कामाला आहे व तो आठवड्यातून एक दिवस घरी येऊन परत जाताना मार्गावरील शेंदुर्णी, पहूर, फर्दापूरमार्गे यासह इतर गावात जेथे संधी मिळेल तेथून दुचाकी चोरी करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय श्यामराव पाटील यांना मिळाली होती. या संशयिताच्या चौकशीसाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, विजय श्यामराव पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, इशान तडवी व नरेंद्र वारुळे यांचे पथक नेमले होते. हे पथक मागावर असतानाऔरंगाबाद येथे या दुचाकीची विक्री करताना जमील याला पकडण्यात आले.
खाकी हिसका दाखवताच काढून दिल्या दुचाकी
दरम्यान जमील याला खाकी हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच औरंगाबाद येथे लपविलेल्या चोरीच्या आठ दुचाकी काढून दिल्या.या दुचाकी पहूर व शेंदुर्णी येथून चोरल्याचे त्याने सांगितले. आणखी दुचाकी चोरल्याचा संशय असल्याने बकाले यांनी त्याला सोबत घेऊन गुरुवारी एक पथक औरंगाबाद येथे पाठविले.