उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: बस स्थानकांवरील गर्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने हातोहात लंपास करणा-या सराईत महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि. १३) गुजरीतून अटक केली. नगीना सागर चौगुले (वय ३६) आणि विठाबाई नितीन चौगुले (वय ४३, दोघी रा. हातकणंगले) अशी अटकेतील दोघींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जप्त केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ वडगाव येथे बसमध्ये बसताना एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाली होती. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस अंमलदार युवराज पाटील आणि संदीप गायकवाड यांना हातकणंगले येथील दोन सराईत चोरट्या महिलांची माहिती मिळाली. संशयित नगीना चौगुले आणि विठाबाई चौगुले या दोघी चोरीतील दागिने विक्रीसाठी रविवारी दुपारी गुजरीत येणार असल्याची माहिती मिळताच, सापळा रचून त्यांना अटक केली. अधिक चौकशीत त्यांच्याकडे चोरीतील सोन्याची चेन मिळाली. पुढील तपासासाठी दोघींचा ताबा पेठ वडगाव पोलिसांकडे देण्यात आला.