यवतमाळ : वाघापूरमध्ये राहणाऱ्या दिवे कुटुंबातील दोन वर्षांचा चिमुकला मामाच्या लाडका होता. मामा घरून पायदळ स्टेट बँक चाैकाकडे निघाला. त्याच्या नकळत रेयांशही मामाचा पाठलाग करू लागला. बँक चाैकात रेयांशला मामा अचानक दिसेनासा झाला. हे पाहून त्याला रडू कोसळले. सर्वच जण अपरिचित होते. याची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी रेयांशला ठाण्यात आणले. त्यानंतर सर्वत्र मॅसेजेस पाठवून शोध सुरू केला. तेव्हा त्याचे आई-वडील गवसले.
रेयांश आकाश दिवे हा दोन वर्षांचा चिमुकला बँक चाैकात भटकला. त्याला बोलताही येत नव्हते. अशा स्थितीत सर्व अनोळखी व्यक्तींना पाहून तो अधिकच भांबावला. ठाणेदार धनंजय सायरे यांनी महिला पोलीस शिपाई रजनी गेडाम यांच्या माध्यमातून रेयांशला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो रडणे थांबवित नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सर्वत्र मॅसेज व निरोप पाठविला. तिकडे रेयांशचे आई-वडील मुलगा मामासोबत गेला, असे समजून बिनधास्त होते. बऱ्याचवेळनंतर रेयांश परत आला नाही, मामाही आता नाही. त्यामुळे रेयांशच्या आईने भावाला फोन करून रेयांशबद्दल विचारणा केली, तेव्हा मामा पंकजने रेयांशला सोबत आणलेच नाही, असे सांगितले. यानंतर दिवे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. दिवे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मामा ज्या स्टेट बँक परिसरात पोहोचला तेथे दिवे कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी गेले. शहर पोलिसांनी परिसरातील लोकांना पूर्वीच रेयांशबाबत माहिती दिल्याने त्यांनी शहर ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. १२ ते १ तब्बल तासभर रेयांशला शांत करताना पोलिसांची दमछाक झाली.
आई रविना पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर भांबावलेल्या रेयांशने तिला ओळखलेच नाही. यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले. मुलगा तुमचाच असल्याबाबत पुरावा मागितला. नंतर रेयांश शांत झाला व त्याने आईला ओळखले. खात्री पटल्यानंतर रेयांशला आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेने मोठी अघटीत होणारी घटना टळली.