जालना : मरणास कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बाजीराव दगडुबा जाधव (२८, रा. हातडी, ता. परतूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२६ ऑक्टोबर २०१९ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी बाजीराव जाधव याने फिर्यादीचा पती सोपान यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली. शिवाय सिमेंट रोडवर ढकलून दिले. त्यामुळे सोपान यांच्या डोक्याला मार लागून ते जागीच मरण पावले. या प्रकरणी बाजीराव जाधव याच्याविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे या प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, इतर साक्षीदार व तपासिक अंमलदार एस. एस. बोडखे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. गारे यांनी आरोपी बाजीराव जाधव याला मरणास कारणीभूत ठरवून दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जे. बी. बोराडे (सोळुंके) यांनी काम पाहिले.