पुणे : शिवसेनेतील बंडखोर आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तसेच, पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदेंनी दिल्या होत्या. त्यानंतर, पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांसह पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना अटक केली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री
"गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे", असे ते म्हणाले.