ब्रिटनमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. एखादी आई हलगर्जीपणाची इतकी सीमा कशी पार करू शकते असा प्रश्न लोकांन पडला होता. ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर सत्य आहे. १८ वर्षाची झाल्यानिमित्त एक महिला आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. पण या सगळ्यात ती तिच्या मुलीला घरीच विसरून गेली. जेव्हा ती सहा दिवसांनी घरी परतली तेव्हा तिला मुलगी मृत आढळून आली. या महिलेला आता कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाऊ शकते.
ब्रिटनच्या ईस्ट ससेक्समधील ब्रायटनची ही घटना आहे. ही घटना डिसेंबर २०१९ मध्ये घडली होती. इथे राहणारी वेर्फी कुदी नावाची महिला तिचा १८वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेली. पण आपल्या मुलील घरीच विसरून गेली. ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यात इतकी बिझी होती की, तिला तिच्या मुलीची जराही काळजी वाटली नाही.
सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं की, महिला पूर्ण सहा दिवसांनी घरी परतली. तिने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगितले की, तिची मुलगी काहीच हालचाल करत नाहीये. द सनच्या रिपोर्टनुसार, ससेक्स पोलिसांनी कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केलं आहे. ज्यात वेर्फी कुदी लंडन कोवेंट्री आणि सोलीहुलमध्ये पार्ट्या करताना दिसत आहे.
सोबतच अशीही माहिती मिळाली की, जेव्हा ती सहा दिवसांनी घरी परतली तेव्हा तिने ९९९ वर कॉल केला. तिने सांगितले की, तिची मुलगी उठत नाहीये. त्यानंतर ती मुलीला घेऊन एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
मुलीच्या मृत्यूनंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. ज्यात समोर आलं की, मुलीचा सांभाळ व्यवस्थित न केल्याने तिचा मृत्यू झाला. ४ ते १२ डिसेंबरपर्यंत मुलगी घरात एकटीच होती. तिचा सांभाळ कुणी केला नाही. ज्यामुळे तिची तब्येत बिघडली होती. तेच महिला वेर्फी कुदीने कोर्टात तिच्यावरील आरोप मान्य केले आहेत आणि आता कोर्ट तिला शिक्षा देणार आहे. इतके दिवस ही केस कोर्टात सुरू होती.