उल्हासनगर :
शहर भाजप विभाग प्रमुखाकडून देशींकट्टा व पिस्तुल ही शस्त्र विकत घेतल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान अटक केलेल्या मध्यप्रदेश पोलिसाना मोहम्मद अब्बासी या आरोपीने दिल्याने एकच खळबळ उडाली. मध्यप्रदेश पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन भाजप विभागप्रमुख निलेश बोबडे यांची चौकशी केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रविवारी मध्यप्रदेश राज्यातील अंजडा पोलीस शस्त्र विक्री प्रकरणी आले होते. अंजडा पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी पेट्रोलींग दरम्यान मोहम्मद अब्बासी नावाच्या इसमाला देशींकट्टा, पिस्तुल व जिवंत काडतुसेसह अटक केली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता, ही शस्त्र भाजप शहर विभागप्रमुख निलेश बोबडे यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी अंजडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मध्यप्रदेश पोलीस रविवारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आली होती.
निलेश बोबडे यांची शस्त्र विक्री बाबतची चौकशी करण्यासाठी मध्यप्रदेश पोलीस आल्याची माहिती, भाजप आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी यांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजप विभागप्रमुख निलेश बोबडे यांची चौकशी मध्यप्रदेश अंजडा पोलिसांनी केली असून तपासा बाबत पोलीस ठाण्याच्या यावे लागेल. असे बजावण्यात आले. तर बोबडे यांनी मोहम्मद अब्बासी या इसमाला मी ओळखत नसून त्याच्या नावाने माझ्या मोबाईलवर फोन आले होते. मात्र हॅलो व्यतिरिक्त काहीएक बोलणे झाले नसून यामागे कोण आहे. हे पोलिसांना शोधावे लागेल. तसेच पोलीस तपासासाठी मध्यप्रदेश अंजडा पोलिसांना सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया बोबडे यांनी पत्रकारांना दिली. बोबडे यांना अटक होऊ नये म्हणूनच आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित असल्याचे बोलले जाते.