सदानंद नाईक
उल्हासनगर : मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने महापालिका अधिकाऱ्यासह दोघाला अटक केल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वी गुन्हे विभागाने चौघांना अटक केली असून दोघे फरार असल्याची माहिती गुन्हे विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर अंबरनाथ गोविंद पुला जवळ ४ अज्ञात इसमानी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉक वेळी तलवारीने हल्ला केला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करून कल्याण मध्ये राहणाऱ्या ४ जणांना अटक केली. अटक केलेल्या चौघांनी हल्ला केल्याची कबुली दिल्यावर, हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला. शेलार यांनी महापालिका शिक्षण मंडळसह अवैध बांधकाम, अन्य समस्या बाबत आवाज उठविला असून यातूनच आपणावर हल्ला झाला असावा. अशी शंका त्यावेळी त्यांनी व्यक्त केली होती. पोलिसांनी चौघांना बोलते केले असता, फरार असलेल्या धर्मेश व नागेश यांनी आम्हाला मारण्याचे सांगितल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात अटक झालेल्या चौघांचे मोबाईल संभाषण तपासले असता, फरार असलेल्या आरोपी धर्मेश, नागेशसह संतोष पगारे व एका महापालिका अधिकाऱ्यां सोबत संभाषण झाल्याचे उघड झाले. यातून संतोष पगारे यांच्यासह महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केल्याची माहिती विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली असून पुढील तपास करीत असल्याचे संकेत त्यांनी दिले. मनसे पदाधिकारी मनोज शेलार हे कुठे जातात. आदींची सविस्तर माहिती संतोष पगारे याने गोळा करून फरारी आरोपी धर्मेश व नागेश यांना दिल्यावर हल्ला झाला असून अटक झालेला महापालिका अधिकारी मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. अटक केलेल्या महापालिका अधिकाऱ्याने माझ्या बाबत शेलार माहिती काढून माझ्या नोकरीवर गंडांतर येणार. या भीतीतून हे कृत्य केल्याची कबुली दिली. अशी माहिती तपास अधिकारी महेश तरडे यांनी पत्रकार यांना दिली.
अटक झालेल्या महापालिका अधिकाऱ्यासी संबंध आलेच नाही - मनोज शेलार
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने माझ्यावरील हल्ला प्रकरणी अटक केलेल्या महापालिका अधिकारी व माझा कधीही संबंध आला नाही. तसेच त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक व विभागा संदर्भात कोणतीही माहिती मागितली नाही. मग माझ्या हल्ल्या मागील सूत्रधार महापालिका अधिकारी कसा काय होऊ शकतो? याबाबत शेलार आश्चर्य व्यक्त केले आहे.